शेअर्स इंट्रा डे ट्रेडिंग : एक उत्तम पैसे कमविण्याचा मार्ग ?
होय, शेअर्स इंट्रा डे ट्रेडिंग हे सर्वांनाच आर्थिक वरदान ठरू शकेल. विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यवसाय करणारे, रिटायर्ड, गृहणी सर्वच शेअर्स मार्केट मध्ये ट्रेडिंग करू शकतात. मनात एकच ध्येय हवे होय मला शेअर्स मार्केटबाबत ज्ञान मिळवायचे आहे तरच हे शक्य होईल. मार्केट मध्ये अनेक मराठी पुस्तके शेअर्स मार्केटवर आहेत, NSE / BSE स्टाॅक मार्केटचे या विषयावर ज्ञान देणारे कोर्सेस आहेत, अनेक क्लासेस फ्री सेमिनारमधून याबाबतचे ज्ञान देत आहेत. तेव्हा याबाबतचे जरूर शिक्षण सर्वांनी घ्यावे ते जन्मभर उपयोगी आहे हे ध्यानात घ्यावे किंवा आपल्या मुलांना प्रोत्साहित करावे. हे डे ट्रेडिंग एक फुल टाईम बिझिनेस आहे तसेच ते पार्ट टाईम बिझिनेस म्हणूनही करू शकतो. हा व्यवसाय असा आहे की सकाळी ९.१५ पासून रात्री ११.३० पर्यंत कधीची आपण करू शकतो. १० मिनिटे करू शकतो, अर्धा तास करू शकतो, अर्धा दिवस करू शकतो, पूर्ण दिवस करू शकतो ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. जर शेअर्स मार्केटकडे वळायचे असेल तर इंट्रा डे ट्रेडिंग एक चांगला पर्याय आहे. जर शेअर्स मार्केटचा अभ्यास नसेल तरी आता वेळ गेलेली नाही आताही आपण शेअर्स मार्केटचा अभ्यास शिकू शकतो व कोणीही १० वी, १२ वी , पदवीधर इंट्रा डे ट्रेडिंग धंद्यासाठी पात्र ठरतील त्यासाठी अनेक मराठी शेअर्स मार्केटवर पुस्तके आहेत ती वाचून आपण सहज पूर्ण ज्ञान घेऊ शकतो. जर कोणताही धंदा करायचाच असेल तर त्या धंद्यातील खाच खळगे, बाजारपेठ, फायदे – तोटे, सहकार्य यांचा तर प्रथम अभ्यास हवाच . जे पदवीधर आहेत त्यांना तर बहुतेक मार्केटचा अंदाज असतो परंतु प्रत्यक्ष कामकाज काय असते ते माहिती नसते जर प्राथमिक ज्ञान हवे असेल तर अनेक संस्थेत क्लास घेतले जातात किंवा इंटरनेटच्या सहाय्याने आपण स्वत:ही ज्ञान प्राप्त करू शकतो.
हया धंद्यासाठी मुख्यत: - भांडवल पाहिजे, ह्या विषयाचे ज्ञान पाहिजे, चार्टसचे ज्ञान तर पाहिजे. ज्यांना अर्ध वेळ हा व्यवसाय करायचा असेल ते आपल्या स्वत:च्या computer वरून, ब्रोकरच्या वेब साईट वरून घरातून, ऑफिसमधून सौदे करू शकतात किंवा शेअर्स ब्रोकरकडे सौदे नोंदवू शकतात किंवा आता तर मोबाईल वरून कोठूनही शेअर्सचे सौदे करू शकतो. ज्यांना पूर्ण वेळ हा धंदा करायचा असेल त्यांना ODIN सारखे पॉवरफूल सॉफ्टवेअर पाहिजे जे सेकंद सेकंदाला शेअर्सची बदलती किंमत दाखविते, online ट्रेडिंग अकाऊंट, डीमॅट अकाऊंट हे जरुरीचे आहे. आज पर्यंत शेअर्स मार्केटला सट्टा समजले जायचे. परंतु आज मार्केटशी जगातील प्रत्येक व्यापारी, बँका, सामान्य सहभागी आहेत. आज हे ज्ञानवंताचे क्षेत्र बनले आहे.
इंट्रा डे ट्रेडिंग म्हणजे प्रथम शेअर्स खरेदी करणे व त्याच दिवशी ते square off करणे किंवा प्रथम हाती नसताना शेअर्स विकून नंतर खरेदी करणे. असे व्यवहार दिवसभर चालू शकतात, कधी कधी एका मिनिटात नफा मिळून आपण सौदा square off करतो तर कधी , १० मिनिटे लागतात, कधी १ तास , कधी २ तास असे नफ्या – तोटयाचे चक्र चालू असते. पैश्याबरोबर आत्मविश्वास व रिस्क घेण्याची तयारी असेल तर या धंद्यामध्ये उतरावे कारण हा खूपच रिस्की धंदा आहे. मनावर कंट्रोल ठेऊन जर इंट्रा डे ट्रेडिंग केले तर फायदा नक्कीच होईल. जर सुरक्षित ट्रेडिंग करायचे असेल तर आपल्या अकाऊंट मध्ये असलेल्या पैशाप्रमाणे शेअर्सची डिलिव्हरी घेऊ शकतो तेव्हढेच शेअर्स घ्यावेत म्हणजे जरी मोठा लॉस होत असेल तर आपण त्या शेअर्सची डिलिवरी घेऊ शकतो व नंतर किंमत वाढल्यावर ते विकू शकतो. प्रत्येक दिवशी जास्तीत जास्त ठराविक म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या भांडवलाचे १ % लॉस झाले तर ट्रेडिंग बंद करावे. समजा आपल्याकडे १ लाख रुपये असतील तर दिवसाला अंदाजे १ करोडचाही धंदा करू शकतो . ब्रोकर्स आपल्याला आपल्या त्याच्याकडे जमा असलेल्या १ लाखावर एकावेळी ५ लाखापर्यंत (५ पट जास्त मार्जीन वापरून) व्यवहार करू देऊ शकतो. समजा दिवसला आपण ५ लाखाचे २० व्यवहार केले तर १ करोडचा धंदा दिवसाला होऊ शकतो. मुख्य भाग आहे ब्रोकरेजचा, त्यासाठी कमी ब्रोकरेज घेणारा ब्रोकर निवडावा व व्यवहार करण्यापूर्वी आपण करणार असणाऱ्या सौदयावर किती ब्रोकरेज भरावे लागेत त्याचे भान ठेवावे. कोणताही धंदा म्हणजे आपण काहीतरी विकत असतो व पुन्हा मार्केट मधून खरेदी करत असतो तसाच हा धंदा आहे. येथे आपणांस खरेदीदारास तोटा झाला तर दुसऱ्या बाजूला विकणाऱ्यास फायदा होतो असे हे चक्र आहे. मुख्य म्हणजे आजच्या मार्केटचा ट्रेंड ओळखता आला पाहिजे तो ओळखता आला तर ५० % विजयी निश्चित होणारच. इंट्रा डे ट्रेडिंग करताना थोडा थोडा नफा मिळत असताना सोडू नये कारण थेंबे थेंबे तळे साचत असते. जास्त मोह करू नये. थोडे थोडे करून दिवसाला एक मोठी रक्कम बनते. ट्रेडिंग करताना आपले ब्रोकरेज वर लक्ष ठेवावे. मुख्य म्हणजे आपले भांडवल वाचविणे हे आपले प्रथमचे काम आहे त्याचे बंधन ठेवले पाहिजे. जर सर सलामत असेल तर पगडी पचास मिळतील म्हणजेच जर आपले भांडवल सुरक्षित असेल तर आपण करोडेचे व्यवहार करू शकतो तेव्हा जर थोडा लॉस होत असेल व अंदाज असेल कि मार्केट आपल्या विरुद्ध जाणार आहे तर ताबडतोब बाहेर पडावे किंवा थोडा लॉस बुक करा ती मोठया नफ्याची पूर्व तयारी असेल.
इंट्रा डे ट्रेडिंगचे फायदे
१) शेअर्स नसताना विकणे.
२) फक्त ठराविक मार्जिन भरून मोठे सौदे करणे.
३) कमी ब्रोकरेज.
४) एकाच दिवशी खरेदी विक्री म्हणून जबाबदारी नाही.
५) आपल्याला मनाला येईल तेव्हा सौदे करणे कोणाचेही बंधन नसते.
६) खरेदीदार किंवा विक्रीदारास हमखास एकाला नफा होतोच.
आपण प्रत्येक दिवशी एक टार्गेट ठेवावा व तशी प्रतिज्ञा घ्यावी. एका दिवसाला मी फक्त समजा १ हजारच लॉस करू शकतो म्हणजे समजा जर आपल्याला यदाकदाचित १ हजारचा लॉस झाला तर त्या दिवशी ट्रेडिंग बंद करावे व दुसऱ्या दिवशीही हाच नियम वापरावा . असाच जर आज आपल्याला २ हजार फायदा झाला तर आजचे ट्रेडिंग बंद करावे व फायदा पदरात पाडावा. एक लक्षात ठेवावे शेअर्स मार्केट वर्षभर चालू राहणार आहे ते आजच बंद होणार नाही तेव्हा एकाच दिवशी वर्षाचा फायदा कमवायला शिकू नये म्हणजेच थोडा फायदा झाल्यावर बाहेर पडावे. चांगले ज्ञान येण्यासाठी बिझिनेस पेपर वाचणे, बिझिनेस चॅनेल बघावे, तज्ञांचे मत ऐकावे, जगाच्या स्टॉक मार्केटची स्थिती पहावी मगच ट्रेडिंगसाठी कंपनी निवडावी. शेअर्स मार्केटमध्ये सर्वांनाच वाव आहे.
आपला अंदाज चुकला तर मोठा तोटा होण्याचा संभव असतो. इंट्रा डे ट्रेडिंगसाठी आज अनेक ठिकाणी संधी आहेत, त्यामध्ये ...
१] EQUITY TRADING
२] DERIVATIVES TRADING [FUTURE & OPTION ]
३] COMMODITY TRADING
४] CURRENCY TRADING
व इतर अनेक संधी उपलब्ध आहेत. या वरील सर्वांमध्ये आपण इंट्रा डे ट्रेडिंग करू शकतो. तरुणांना ह्या धंद्यामध्ये खूप वाव आहे त्यासाठी अभ्यास नेहमी चालू ठेवावा लागेल. म्हणजेच आपल्याला सकाळी ९ ते रात्री ११.३० पर्यंत पूर्ण दिवस काम आहे व पैसे मिळवू शकतो. मुख्य म्हणजे टेक्निकल चार्टसचा चांगला अभ्यास केला पाहिजे. टेक्निकल चार्टसचा इंट्रा डे ट्रेडिंगसाठी अभ्यास खूपच आवश्यक आहे. टेक्निकल चार्टसचा अभ्यास करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक पुस्तके उपलब्ध आहेत, वेबसाईटवर अनेक लेख उपलब्ध आहेत त्यांचा अभ्यास करणे जरुरी आहे. इंट्रा डे ट्रेडिंगसाठी थोडया थोडया फरकाचा फायदा घ्यायचा असतो. चार्टस वरून आपणांस ट्रेन्डचा ताबडतोब अंदाज येतो. शेअर्स मार्केटमध्ये आज कशा हालचाली चालू आहेत ते कंपनीच्या चार्टवर नजर टाकल्यास ताबडतोब कल्पना येते व निर्णय घ्यायला खूपच मदत होते. चार्टसमुळे आपणांस अनेक माहितीचा खजाना मिळतो. त्याच्या जोरावर आपण फायदा कमावू शकतो. अनेक वेबसाईटवर इंट्रा डे चार्टस , विकली चार्टस, मंथली चार्टस आपणांस दिसतात त्या ट्रेंडचा अभ्यास चालू ठेवावा.
इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये कोणतेही केलेले सौदे मार्केट त्यादिवशी बंद होण्यापूर्वी व्यवहार पूर्ण करावे लागते. त्या दिवसापुरता नफा-तोटा स्विकारावा लागतो. इंट्रा डे चा दुसरा फायदा म्हणजे हा व्यवहार मुख्यतः मार्जिन वापरून करावा लागतो. प्रत्येक ब्रोकर्स इंट्रा ट्रेडिंगसाठी ५ ते २० पट जास्त एक्स्पोझर देत असतात. ह्या ट्रेडिंगसाठी आपले ब्रोकर्सकडे असणाऱ्या भांडवलावर ५ ते १० पट जास्त ट्रेडिंग करू शकतो.समजा आपले ब्रोकेर्सच्या अकाऊंटमध्ये १ लाख असतील तर ब्रोकर्स आपल्याला ५ लाखापर्यंत सौदे करू देतात. काही ब्रोकर तर आपणांस २५ पट जास्त ट्रेडिंगसाठी मार्जिन उपलब्ध करून देतात.
ट्रेडिंग करताना मुख्य म्हणजे सेकंद सेकंदाला बदलणारे भाव समजण्यासाठी ODIN सारखे पॉवरफुल सॉफ्टवेअर हवे त्यामध्ये पूर्ण इंट्रा डे ट्रेडिंगच्या सुविधा असतात.
चार्टस तर क्षणाक्षणाने बदलणारे असतात. चार्टवर मुख्य इंट्रा डे ट्रेडिंगचा कल माहिती पडतो. जर आपल्याकडे जास्त भांडवळ असेल व इंट्रा डे मध्ये जर नुकसान होत असेल तर आपण त्या शेअर्सची मार्जिन ट्रेडिंग [इंट्रा डे ट्रेडिंग ] मधून डिलिवरीमध्ये ट्रान्सफर करू शकतो व तोटा वाचवू शकतो.. नंतर जेव्हा भाव वाढेल तेव्हा ते शेअर्स विकू शकतो.
फ्युचर [futures] म्हणजे डेरीवेटिवजमध्ये इंट्रा डे ट्रेडिंग करायचे असेल तर येथे लॉट प्रमाणे ट्रेडिंग करावे. लॉट साईज मात्र मोठा असतो. जर मोठी रिस्क किंवा जास्त फायदा घ्यायचा असेल तर फ्यूचर ट्रेडिंग उत्तम. येथे जर आज फायदा झाला नाही तर आपण महिन्याच्या शेवटच्या गुरुवार पर्यंत carry forward करू शकतो किंवा तीन महिने ठेऊ शकतो ते आपण घेतलेल्या महिन्यावर अवलंबून असते. फ्युचर ट्रेडिंगमध्ये आपण प्रथम खरेदी करू शकतो किंवा प्रथम विकूही शकतो. या ट्रेडिंगसाठी खूपच कमी मार्जिन भरावी लागते.
ऑप्शन [OPTION ] म्हणजेच डेरीवेटिवजमध्ये जर इंट्रा डे ट्रेडिंग करायचे असेल तर येथे कॉल व पुट ची खरेदी किंवा विक्री करू शकतो. येथे फक्त आपणांस प्रीमिअम भरावे लागते व ते सेटलमेंट पर्यंत ठेऊ शकतो किंवा ३ महिन्यापर्यंत ठेवू शकतो येथे आपला जास्तीत जास्त तोटा हा आपण भरलेला प्रिमियम हा असतो तेवढाच होतो व फायदा अनलिमिटेड असतो..
इक्विटी व डेरीवेटिवज मार्केट सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंत उघडे असतात. तर कमोडीटी मार्केट सकाळी १० ते रात्री ११.३० पर्यंत [गोल्ड व सिल्वर] उघडे असते. आपण आपल्या ब्रोकर्सकडे असणाऱ्या भांडवळावर सकाळी ९.१५ ते रात्री ११.३० पर्यंत डे ट्रेडिंग करू शकतो. यासाठी आपण ह्या सुविधा एकाच ब्रोकर्सकडे उपलब्ध असतील अशा ब्रोकर्सकडे अकाऊंट उघडावे म्हणजे जास्त फायदा होईल व कमी ब्रोकरेज घेणाऱ्या ब्रोकर्सकडे अकाऊंट उघडावे म्हणजे फायदा होईल.
आता घरी बसून आपण ऑनलाईन इंट्रा डे ट्रेडिंगचे व्यवहार सहज करू शकतो. त्यासाठी एखादया शेअर्स ब्रोकर्सकडे ज्यांचा ऑनलाईन टर्मिनल आपण वापरू शकतो किंवा बँकेकडे ३ इन १ (सेविंग, डिमॅट व ट्रेडिंग ) खाते उघडावे लागेल. एकदा ब्रोकर्सकडे ऑनलाईन अकाऊंट उघडल्यावर ब्रोकर्स आपणांस USER NAME व PASSWORD देतो. आपले डिमॅट अकाऊंट व बँक अकाऊंट आपल्या ऑनलाईन कनेक्ट असतात. जेव्हा शेअर्स खरेदी करतो तेव्हा शेअर्स आपल्या डिमॅट अकाऊंटमध्ये जमा होतात व पैसे आपल्या बँक अकाऊंटमधून कमी होतात व जेव्हा आपण शेअर्सची विक्री करतो तेव्हा शेअर्स आपल्या डिमॅटअकाऊंट मधून कमी होतात व पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा होतात. हे सर्व व्यवहार आपण घरी बसून करू शकतो. ब्रोकेर्सला फोन करण्याची जरुरी नाही, बँकमध्ये जाण्याची जरुरी नाही. ऑनलाईन अकाऊंटमध्ये आपणांस खरेदी किंवा विक्री केलेल्या शेअर्सबद्दल पूर्ण माहिती मिळते. आपल्या बँक अकाऊंट मध्ये किती शिल्लक आहे, डिमॅट अकाऊंटमध्ये कोणते शेअर्स आहेत, त्यांची आताची किंमत काय आहे ह्या सर्वांची माहिती आपणांस येथे मिळते.




